नवी मुंबई: उरणजवळ चिरनेर या गावात नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. गावाजवळ एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळावर लिंबू, हार, अगरबत्ती, अर्धवट जळालेली कवटी सापडल्यानं नरबळीचा संशय उत्पन्न होतोय.
उरणमधल्या चिरनेर गावाजवळच्या जंगलात गेल्या १० ते १२ दिवसांपासून एका १४-१५ वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडला असल्याची चर्चा आदिवासींमध्ये होती. मात्र कुणीही याबाबत उघड बोलत नव्हतं. अखेर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर सापडले अवशेष.
पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये एक अर्धवट जळालेली कवटी मिळालीय. या कवटीजवळ लिंबू, हार, अगरबत्ती, कुंकू सापडल्यानं हा अघोरी विद्या किंवा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
या मृतदेहाजवळ एक कपड्यांची बॅगही सापडलीय. या बॅगेत कपडे, पनवेल ते पेण एसटी बसचं तिकीट मिळालंय. यावरून पोलीस प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.