www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एक पेक्षा जास्त दिग्गज इच्छूक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढंच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनिती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसनं इतर पक्षांपेक्षा आघाडी घेतल्याचं चित्र आहे. सहा महिन्यांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बैठकांचा सिलसिला सुरू केला. दुसरीकडे जागा वाटपाची चर्चा लवकरत सुरू करावी, असा घोषा काँग्रेसमागे लावला. असं असलं तरी राष्ट्रवादीची उमेदवारी यादी अद्याप पूर्ण होत नाहीये. यासाठी नजिकच्या काळात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा चार बैठका झाला. २२ जागा लढवायच्या हे गृहित धरून राष्ट्रवादीनं उमेदवाराची यादी बनवण्यास सुरुवात केली. यातल्या १५ जणांवर नावं निश्चित झाली असली तरी सात मतदारसंघांचा पेच अद्याप कायम आहे.
कोणत्या जागा अडल्या
> बीडमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. त्यामुळे इथला उमेदवार निश्चित झालेला नाही.
> शरद पवार खासदार असलेल्या माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये चुरस आहे.
> रावेरमध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्यानं हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.
> ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी हातकणंगल्यातून लढण्यास नकार दिल्यामुळे इथून कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न कायम आहे.
> शिरूरमधून आमदार वल्लभ बेनेके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालाय. मात्र ते लोकसभा लढवायला इच्छुक नाहीत.
> अहमदनगरमध्ये राजीव राजळे आणि विक्रम पाचपुते यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय होत नाहीये
> सातव्या मावळ मतदारसंघात पक्षाला योग्य उमेदवार मिळत नसल्याने इथला पेचही कायम राहिलाय.
अल्टिमेटम देऊनही जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं अद्याप तरी काहीच हालचाल केलेली नाही. तर दुसरीकडे आपल्या उमेदवारांची यादीही राष्ट्रवादीला अद्याप अंतिम करता आलेली नाही. त्यामुळं सहा महिने आधीपासून निवडणुकीची तयारी सुरू करूनही राष्ट्रवादीमध्ये गोंधळाचं वातावरण कायम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.