www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेय. राज यांच्यावर टीका होत आहे. तर शिवसेनेने गडकरी यांना टार्गेट केलेय. मुंडे म्हणत आहेत, सहावा भिडू नको, असा सूर लावत आहेत. त्यामुळे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढवणार किंवा कसे याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य शिगेला पोहोचले आहे. रविवार ९ मार्च रोजी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज भूमिका जाहीर करतील अशी आशा आहे. नवे टोल धोरण जाहीर करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने राज यांना टोलवलं. तर भाजप नेत्यांच्या विनंतीवरून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास राजकीय साठेलोट केल्याचा आरोप होत आहे. हा निवडणुकीसाठी आरोप धोक्याचा होऊ शकतो, त्यामुळे राज आपली भूमिका मांडतील, अशी अपेक्षा आहे.
राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर टोलविरोधी आंदोलन केले. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवे टोल धोरण मंजूर करण्याचे आश्वासन राज यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. प्रत्यक्षात निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत नवे टोल धोरण मंजूर झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक न लढवता काँग्रेसला धडा शिकवण्याचा पर्याय राज यांच्यापुढे आहे. मात्र भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर मनसेच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढण्याची भीती आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.