www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिवसेना सोडून आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे, अशी चर्चा होती.
शिर्डी साई संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी डिसेंबर २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २००९च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघातून सेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर खासदार म्हणून विजयी झाले.
त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा तब्बल १ लाख ३२ हजार ७५१ मतांनी पराभव केला होता. शिर्डीत मतदारांची संख्या १३ लाख ११ हजार होती. त्यामध्ये मराठा ४०टक्के, तर दलित-मुस्लिम समाजाची 30 टक्के मते होती. मात्र तरीही आरपीआयची पाटी कोरीच राहिली.
आधी कल्याणचे खासदार आनंद परांजपे आणि आता शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे अखेरचा जय महाराष्ट्र करणार, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आपण शिवसेना सोडणार नाही, असे वाकचौरे यांनी म्हटलंय. यासंदर्भात खासदार वाकचौरे यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी मात्र कानावर हात ठेवले.
का रंगली चर्चा
याआधीच कल्याणचे खासदार आनंद परांजपे हे शरद पवारांचे बोट धरून राष्ट्रवादीच्या वळचणीला गेलेत. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसच्या तंबूत दाखल होणार, असं म्हटलं जात होतं. कारण वाकचौरे यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन काँग्रेसश्रेष्ठींनी दिल्याचं समजतंय..
गेल्या दोन-अडीच महिन्यापासून पडद्याआड या राजकीय घडामोडी सुरू होत्या. यासंदर्भात खासदार वाकचौरे यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी मात्र कानावर हात ठेवले.शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आलेला होता. परंतु तो राखीव झाल्यानं २००९ मध्ये रामदास आठवलेंसाठी राष्ट्रवादीनं तो मागून घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब विखे पाटील यांना हा निर्णय फारसा रूचला नव्हता. त्यामुळं काँग्रेसमधूनच आठवलेंना दगाफटका झाला आणि वाकचौरे यांचा विजय सुकर झाला.
निवडून आल्यानंतरही वाकचौरेंनी विखे-पाटलांशी जुळवून घेतलं होतं. आता त्यांच्याच आशीर्वादानं वाकचौरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसकडेही शिर्डीत तुल्यबळ उमेदवार नसल्यानं, शिवसेनेचा खासदार जाळ्यात ओढण्याची युक्ती काँग्रेसनं आखली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.