www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपचं अभिनंदन करतांना महाराष्ट्रात मात्र मनसेच ‘आप’चा बाप असल्याचं म्हटलंय. दिल्लीमध्ये काम न केल्याचा काँग्रेसला फटका बसला असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली मत मांडली.
आपची जादू महाराष्ट्रात चालणार नाही, असं म्हणत मनसेच बाप असल्याचं राज म्हणाले. महाराष्ट्र सरकारवर टीका करत आता कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही, असा टोला राज ठाकरेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारांना मारला.
सारखी गुजरातचीच स्तुती करणारे आणि नरेंद्र मोदींचे मित्र असलेले राज ठाकरेंनी यावेळी मोदींवरही हल्ला चढवला. आता पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतर देशाचा विचार करावा, एकट्या गुजरातचा नाही, असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला.
महाराष्ट्र आजही प्रगतीच्या बाबतीत अग्रस्थानी आहे, मात्र आपण त्याचा आलेख चढता ठेवायला हवा, असं सांगत राज्यात सत्ता स्थापन करण्याची माझी इच्छा आजही कायम आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज्याची मातेसारखी काळजी घेतो
महाराष्ट्रात आपचा करिष्मा चालणार नाही, महाराष्ट्रात मनसेचं बाप असेल, अशी टीका राज ठाकरे यांनी आपवर केली आहे. राज ठाकरे यांच्या या बाप वक्तव्याला राष्ट्रवादीनेही उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी आम्ही राज्याच्या बापाची भूमिका पार पाडण्यापेक्षा, राज्याची मातेसारखी काळजी घेतो, असं उत्तर दिलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.