www.24taas.com, लंडन
ऍपलचे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी जगताचा सम्राट स्टीव्ह जॉब्सवर प्रतिकृती असलेली बाहुली चीनी कंपनीने बाजारपेठेतून मागे घेतली आहे. ऍपलचे कायदेशीर सल्लागार यांनी कंपनीवर मोठा दबाव टाकल्याने कंपनीला हे पाऊल उचलावं लागल्याचं वृत्त आहे
जॉब्सच्या व्यक्तीमत्वाची हुबेहुब प्रतिकृती असलेली ही ३० सेंटीमीटरची बाहुली त्याच्या प्रमाणेच काळा टीशर्ट, जीन्स आणि चष्मा घातलेली आहे. जॉब्सचे निधन झाल्यानंतर तीन महिन्यांनी या बाहुलीची जाहिरात कंपनीने केल्याचं स्काय न्युजने म्हटलं आहे.
स्टुलासह बाहुली आणि त्यावर वन मोर थिंग ही जॉब्सने एक गॅजेट लाँच करताना वापरलेली टॅगलाईनसह बाजारपेठेत विक्रीला येणार होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार द्रष्टा आणि जिनियस असलेल्या स्टीव्ह जॉब्सला वाहलेली ही अनोखी आदरांजली होती. पण ऍपलचे कायदेशीर सल्लागार आणि स्टीव्ह जॉब्सचे कुटुंब यांनी टाकलेल्या दबावामुळे या बाहुलीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्यात आली. जॉब्स कुटुंबाच्या भावनांचा आदर करत आम्ही उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीने म्हटलं आहे.