त्या १५ आंतरराष्ट्रीय मॅच 'फिक्स', अल-जजीराचं स्टिंग ऑपरेशन

कतारची वृत्तवाहिनी अल-जजीरानं पुन्हा एकदा क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे.

Updated: Oct 22, 2018, 07:37 PM IST
त्या १५ आंतरराष्ट्रीय मॅच 'फिक्स', अल-जजीराचं स्टिंग ऑपरेशन title=

दुबई : कतारची वृत्तवाहिनी अल-जजीरानं पुन्हा एकदा क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे. अल-जजीरानं रविवारी स्पॉट फिक्सिंगबद्दलची त्यांची दुसरी डॉक्युमेंट्रीसमोर आणली. यामध्ये २०११ ते २०१२मध्ये जवळपास १५ आंतरराष्ट्रीय मॅच फिक्स असल्याचं सांगण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)नं अल-जजीराकडे या सगळ्याचे पुरावे देण्याची मागणी केली आहे.

याआधी अल-जजीराच्या पहिल्या डॉक्युमेंट्रीमध्ये २०१६ डिसेंबरमध्ये चेन्नईत झालेली टेस्ट आणि मार्च २०१७ मध्ये रांचीत झालेल्या टेस्टमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. या दोन्ही मॅचमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची नावं समोर आली होती. त्या डॉक्युमेंट्रीमध्ये मुनावर नावाच्या सट्टेबाजाचं नाव समोर आलं होतं. यावेळी पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची नाव समोर आली आहेत.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार अल-जजीराच्या दुसऱ्या डॉक्युमेंट्रीमध्येही अनिल मुनावरचं नाव आहे. अनिल मुनावर डी कंपनीसाठी काम करतो. मुनावर भारतातल्या एका व्यक्तीला फिक्स झालेल्या मॅचबद्दलची माहिती देत होता. २०११-१२ मधल्या ज्या १५ मॅचचा उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आलाय. त्यातल्या ७ मॅचमध्ये इंग्लंड, ५ मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि ३ मॅचमध्ये पाकिस्तानचे खेळाडू सामील असल्याचं सांगण्यात आलंय.

आयसीसीनं अल-जजीराकडे फुटेज मागितलं

या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयसीसीनं अल-जजीराकडे डॉक्युमेंट्रीचं अनएडिटेड फूटेज मागितलं आहे. पण अल-जजीरानं ते द्यायला नकार दिल्याची माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी दिली आहे. आयसीसीनं मुनावरला ओळखण्यासाठी सार्वजनिकरित्या आवाहनही केलं होतं. या आरोपांनंतर आम्ही चौकशीला सुरुवात केली आहे. चॅनलनं हे फुटेज इंटरपोलला द्यावं असंही आम्ही सांगितल्याचं मार्शल म्हणाले.

'फिक्सिंगचे पुरावे नाहीत'

अशाप्रकारे स्पॉट फिक्सिंग झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याची प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिली आहे. ईसीबीला भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी माहिती आहे. अल-जजीरानं मर्यादित माहिती दिली आहे. यानंतर ईसीबीनं ही माहिती तपासली पण माजी क्रिकेटपटू किंवा सध्याचे क्रिकेटपटू यांच्याबद्दल आम्हाला कोणताच संशय नाही, असं ईसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.