'...तर आज पाकिस्तान फायनलमध्ये असता'; गौतम गंभीरचा पारा चढला! बाबर आझमला झापलं

Gambhir Slams Babar Azam: श्रीलंकेविरुद्धचा सामन्यामध्ये पाकिस्तानचा अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव झाला आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ थेट स्पर्धेबाहेर पडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 16, 2023, 10:02 AM IST
'...तर आज पाकिस्तान फायनलमध्ये असता'; गौतम गंभीरचा पारा चढला! बाबर आझमला झापलं title=
बाबरने केलेल्या चुकांचा पाढाच गंभीरने वाचला

Gambhir Slams Babar Azam: सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील सुपर-4 फेरीतील सामने संपले असून भारत आणि श्रीलंकेदरम्यान अंतिम सामना उद्या म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. श्रीलंकेने करो या मरोच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तान पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कठोर शब्दांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर पराभव झाला. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानदरम्यान अंतिम सामना पाहण्याची चाहत्यांची संधी यंदाच्या पर्वातही हुकली आहे.

काय म्हणाला गंभीर?

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूंमध्ये चरिथ असालंकाने विजयासाठी आवश्यक असलेल्या 6 धावा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामना सुरु असतानाच गौतम गंभीरने बाबर आझमचं नेतृत्व आणि पाकिस्तानी गोलंदाजाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. बाबरने ज्या पद्धतीने फिल्डींग सेट केली होती ती फारच सुमार दर्जाची होती असं गंभीरने म्हटलं आहे. योग्य क्षेत्ररक्षणाच्या मदतीने पाकिस्तानला बऱ्याच धावा रोखता आल्या असत्या असं सांगितलं. गंभीरने कर्णधार म्हणून बाबर आझमने केलेल्या 3 चुकांचं सविस्तर विश्लेषण करताना पाकिस्तानी कर्णधाराला झापलं आहे. बाबरने या चुका केल्या नसत्या तर आज नक्कीच पाकिस्तान अंतिम सामन्यात खेळत असता असंही गंभीरने म्हटलं आहे.

पहिली चूक

गंभीरने स्टार स्पोर्टसला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "माझ्यामते त्याचं नेतृत्व फारच साधारण ठरलं. जमान खानच्या ओव्हरमध्ये मिडऑनला चौकार लगावला. तर शाही आफ्रिदीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मिडॉफवरुन चौकार लगावला. हे दोन्ही चेंडू कमी गतीचे होते," असं म्हटलं. "धीम्या गतीत चेंडू टाकणार होते तर मिड ऑफच्या फिल्डरला लाँग ऑफला पाठवून थर्ड मॅन थोडा आतमध्ये उभा करायला हवा होता," असंही गंभीर म्हणाला.

दुसरी चूक

"कर्णधार म्हणून ही फारच साधारण कामगिरी होती. तुम्हीच असा विचार करा की शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावा करायच्या असत्या तर श्रीलंकेसाठी आव्हान फार कठीण झालं असतं," असं गंभीर म्हणाला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार श्रीलंकेला विजयासाठी 42 षटकांमध्ये 252 धावांची गरज होती. शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. "एका पॉइण्टनंतर हा सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवण्यासाठी पाकिस्तानच जबाबदार ठरला. तुम्ही तुमच्या मुख्य गोलंदाजाऐवजी सहाव्या गोलंदाजाच्या ओव्हर्स पूर्ण करुन घेता हे चुकीचं आहे. अशाप्रकारे सामने जिंकता येत नाही," असं म्हणत गंभीरने बाबरला सुनावलं.

तिसरी चूक

ज्या पार्टनरशीपचा फटका पाकिस्तानला बसला त्याबद्दल बोलताना गंभीरने, जेव्हा सदीरा आणि मेंडिस पार्टनरशीप करत होते तेव्हा तुम्ही तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. मात्र असं झालं नाही. पाकिस्तानला हा सामना केवळ श्रीलंकेचे सर्व गडी बाद करुनच जिंकता आला असता, असं गंभीर म्हणाला. श्रीलंकेचा संघ अगदी योग्यरितीने फलंदाजी करत असता तर ते फार आधीच जिंकले असते, असंही गंभीरने म्हटलं. एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट वेगवेगळे फॉरमॅट आहेत. त्यामुळेच बाबरने आपल्या नेतृत्वामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असंही गंभीर म्हणाला.