IPL 2019: विराट-रोहित भिडणार, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा

आयपीएलमध्ये गुरुवारी २८ मार्चला विराट कोहलीची बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबईमध्ये सामना होणार आहे.

Updated: Mar 28, 2019, 05:58 PM IST
IPL 2019: विराट-रोहित भिडणार, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा title=

बंगळुरू : आयपीएलमध्ये गुरुवारी २८ मार्चला विराट कोहलीची बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबईमध्ये सामना होणार आहे. या दोन्ही टीमना या मोसमातल्या पहिल्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता. या मॅचमध्ये दोन्ही टीम त्यांच्या पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये खातं उघडण्यासाठी मैदानात उतरतील. रात्री आठ वाजता बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मॅचला सुरुवात होईल.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला पहिल्या मॅचमध्ये दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या मॅचमध्ये मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती. बुमराहच्या खेळण्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे लसिथ मलिंगाच्या पुनरागमनामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे.

लसिथ मलिंगाला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. वर्ल्ड कप लक्षात घेता श्रीलंकेमधल्या स्थानिक वनडे स्पर्धेत खेळणं श्रीलंकेनं बंधनकारक केलं होतं. पण बीसीसीआयने विनंती केल्यानंतर श्रीलंकेनं मलिंगाला आयपीएल खेळायला परवानगी दिली. बंगळुरुविरुद्धच्या मॅचसाठी मलिंगा उपलब्ध असेल.

न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ऍडम मिलने दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण मोसमाला मुकणार आहे. मिलनेच्या जागी मुंबईने बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफची निवड करण्यात आली आहे. अल्झारी जोसेफची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली असली तरी तो मैदानात कधी उतरेल याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मुंबईच्या टीमने दिलेली नाही.

दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला होता. या मॅचमध्ये मुंबईची बॉलिंग फारशी चांगली झाली नव्हती. तर बॅटिंगमध्येही युवराजचं अर्धशतक वगळता कोणत्याही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही.

दुसरीकडे बंगळुरूचा चेन्नईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये लाजिरवाणा पराभव झाला होता. बंगळुरूची टीम त्या मॅचमध्ये फक्त ७० रनवर ऑल आऊट झाली होती. आयपीएल इतिहासातला हा सहावा सगळ्यात कमी स्कोअर आहे.

संभाव्य टीम

बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिमरोन हेटमायर, मोईन अली, कॉलीन डि ग्रॅण्डहोम, शिवम दुबे, उमेश यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

मुंबई : रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मिचेल मॅकलेनघन, लसीथ मलिंगा, मयंक मार्कंडे, रसीक सलाम