IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'

IPL PlayOffs: आज आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि बंगळुरु (RCB) संघात हा सामना होणार असून, जिंकणारा संघ सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे.   

शिवराज यादव | Updated: May 22, 2024, 09:29 AM IST
IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...' title=

IPL PlayOffs: आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात होणार असून यानंतर एक संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघातील एलिमिनेटर सामना होणार आहे. जो संघ विजयी होईल त्याचा सामना शुक्रवारी हैदराबादशी होणार आहे. तसंच ज्या संघाचा पराभव होईल तो स्पर्धेतून बाद होईल. एकीकडे राजस्थान रॉयल्स संघ सलग चार पराभव आणि पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यानंतर मैदानात उतरत आहे. तर दुसरीकडे बंगळुरु संघाने सलग 6 सामने जिंकत प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. 2008 मधील आयपीएल विजेता हैदराबाद संघ एका क्षणी सर्वोत्तम कामगिरी करणार होता. पण आता अचानक दुबळा संघ म्हणून पुढे आला आहे. 

राजस्थान संघाने सुरुवातीला जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मागील चार सामन्यात त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील त्रुटी समोर आल्या आहेत. जोस बटलर संघातून बाहेर पडल्याने त्यांच्या फलंदाजीवर मोठा प्रभाव पडला आहे. जोस बटलर गेल्याने यशस्वी जैसवाल, संजू सॅमसन, रियान पराग यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. 

दरम्यान आजच्या सामन्याचा निकाल काय असेल याबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भाष्य केलं आहे. हा सामना एकतर्फी होईल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली आहे. त्यांनी बंगळुरु संघाचं आणि खासकरुन विराट कोहली, फाफ डू प्लेसिसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

"आरसीबीने जे काही केले ते अभूतपूर्वपेक्षा कमी नाही. सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी आपण पुनरागमन करु शकतो यावर विश्वास ठेवला. त्यासाठी काहीतरी विशेष आवश्यक आहे. त्यांचे आघाडीचे खेळाडू फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि वरिष्ठ खेळाडू यांनी इतर खेळाडूंना सर्वात जास्त प्रोत्साहन दिलं आहे. संघातील इतर संघ अशावेळी फार नैराश्यात जाण्याची शक्यता असते. अरे आपण सर्व काही गमावलं आहे असं त्यांना वाटू शकतं. पण दोघांनीही जबरदस्त क्रिकेट खेळलं आहे," असं सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितलं.

"राजस्थानने 4 ते 5 सामने गमावले आहेत. त्यांनी शेवटचा सामनाही खेळला नाही. त्यांना आता खेळण्याचा सराव नाही. 11 दिवस न खेळूनही कोलकाताने आज जे काही खास केलं ते त्यांनी केले नाही तर चांगली स्पर्धा होऊ शकते. मला हा सामना एकतर्फी होईल अशी भीती वाटत आहे. जेव्हा बंगळुरु संघ राजस्थानला चिरडेल. तसं झालं नाही तर मला आश्चर्य वाटेल," असं गावसकर म्हणाले आहेत.