IND VS ENG: न्यूझीलंडविरोधात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. दमदार कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूंची संघात उपस्थिती असतानाही या संघाला काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. प्रतिस्पर्धी संघापुढं भारतीय संघानं एका अर्थी सारी शस्त्र टाकून दिली होती. फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या या यादीत संघातील स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश होतो.
वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुमराहची न्यूझीलंडच्या संघाविरोधातील कामगिरी फारशी चांगली ठरली नाही. अतिशय महत्त्वाच्या अशा या सामन्यातील दोन्ही खेळींमध्ये एकही गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं नाही. खेळपट्टी आणि हवामान गोलंदाजांसाठी पूरक असतानाही बुमराहच्या वाट्याला आलेलं अपयश क्रीडारसिकांचीही निराशा करुन गेलं.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर
बुमराहची सध्याची कामगिरी पाहता इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळण्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे. दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आधी भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभव पत्करण्याच्या मनस्थितीत नाही, ज्यामुळं संघातून बुमराहला वगळलं जाण्याची शक्यता काही क्रीडा अभ्यासकांनी वर्तवली आहे.
विराट कोहलीच्या काही खास खेळाडूंपैकी एक म्हणून चर्चेत असणाऱ्या मोहम्मद सिराज याला संघात स्थान मिळण्याचा तर्क सध्या लावला जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या सिराजनं त्याच्या गोलंदाजीतून कायमच वेग, फिरकी आणि सीम मूवमेंटचं प्रदर्शन केलं आहे. पहिल्या सामन्यातच त्यानं पाच गडी बाद करण्याची कामगिरीही केली होती. ज्यामुळं बुमराहऐवजी संघात त्याला स्थान दिलं जाऊ शकतं.
येत्या काळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांदरम्यान भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 ऑगस्टदरम्यान नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे. यानंतर 12 ते 16 ऑगस्टपर्यंत लंडनमध्ये लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडेल. तिसरा कसोटी सामना, 25 ते 29 ऑगस्टदरम्यान, लीड्स येथे तर चौथा कसोटी सामना 2ते 6 सप्टेंबरदरम्यान लंडनमधील ओवल मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना, मँचेस्टर येथे खेळला जाणार आहे. तेव्हा आता या मालिकेमध्ये संघाची कामगिरी कशी असणार आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये नेमकं कोणाला स्थान मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.