मुंबई : मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईची टीम जाहीर करण्यात आली आहे. भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली मुंबई क्रिकेट टीमच्या निवड समीतीने शनिवारी ही निवड केली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने १५ खेळाडूंची टीम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दुखापतीमुळे बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ चे मुंबईच्या टीममध्ये पुनरागमन झाले आहे.
भारतीय टीममधून बाहेर असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे मुश्ताक अली क्रिकेट टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या टीमचं नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ही मालिका २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान इंदूर येथे होणार आहे. मुंबईच्या टीममध्ये रहाणे सोबतच श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यकुमार यादव आणि अनुभवी विकेटकीपर फलंदाज आदित्य तरे यांना देखील स्थान देण्यात आले आहे.
मुंबईच्या बॉलिंगची धुरा धवल कुलकर्णीकडे असेल. मुंबईनं नुकत्याच झालेल्या रणजी करंडक आणि विजय हजारे करंडकात खराब कामगिरी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या इराणी करंडकात अजिक्य रहाणेच्या नेतृत्वात शेष भारताचा पराभव झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता, पण पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ रनच्या आघाडीमुळे विदर्भाला विजयी घोषित करण्यात आले. रहाणेला या सामन्यातील पहिल्या डावात आपल्या बॅटिंगनं विशेष असं करता आले नाही, पण दुसऱ्या डावात त्याने ८७ रनची खेळी केली.
मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केकर, धुरमिल मटकर, शम्स मुलानी, शुभम रंजन, तुषार देशपांडे आणि रोयस्टन डियाज