मुंबई : टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूरने 2020-21 मध्ये गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावत टीमच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. दरम्यान याबाबत नुकतंच अजिंक्य रहाणेने एक मोठा खुलासा केलाय.
अजिंक्य रहाणेच्या म्हणण्यानुसार, या सामन्यात शार्दूल ठाकूर आऊट झाल्यावर टीमचा ओपनर फलंदाज रोहित शर्मा संतापला होता. पण नेमकं असं काय झालं होतं, ज्यामुळे रोहित शर्मा संतापला होता, ते जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या दौऱ्यावर एक डॉक्युमेंट्री रिलीज करण्यात आली आहे. 'बंदो मे था दम' असं या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे. त्यावेळी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने एक गोष्ट सांगितली.
टेस्ट सीरिजच्या चौथ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये शार्दुलने ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियमवर पहिलं अर्धशतक झळकावलं. मात्र एक खराब शॉट खेळून तो पव्हेलियनमध्ये परतला होता. यावरूनच रोहित शर्मा वैतागला होता.
शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात 67 रन्सची स्फोटक खेळी केली होती. डॉक्युमेंट्रीमध्ये याचं वर्णन करताना रहाणे म्हणाला, त्यावेळी टीमला विजयासाठी केवळ 10 रन्स आवश्यक होते. शार्दुलला मैदानावर जाण्यापूर्वी रोहितने सांगितलं होते की, हीच वेळ आहे. या सामन्यातून तुला हिरो बनण्याची चांगली संधी आहे. यानंतर शार्दुलने फक्त मान हलवली आणि बॅटिंगला गेला.
शार्दुल ठाकूरला फोर मारून सामना संपवायचा होता, त्यासाठी त्याने एक लांब शॉट मारला. पण त्याचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला आणि तो कॅचआऊट झाला. दरम्यान बाद झाल्यानंतर रोहित शर्मा संतापला होता.
यावेळी रहाणे म्हणाला की, "रोहित माझ्या शेजारी बसला होता आणि विजयाच्या जवळ पोहोचताच, शार्दुलने असा शॉट मारल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. त्यावेळी रागाच्या भरात रोहित म्हणाला, फक्त ही मॅच संपू दे, आपण एकदा का जिंकलो, मग मी याला बघतो, याला चांगलाच धडा शिकवतो."
रहाणेच्या म्हणण्याप्रमाणे, त्यावेळी रोहितला मी तातडीने शांत केलं आणि मॅच संपल्यानंतर आपण काय ते बघू असं रोहितला सांगितलं.
मात्र, शार्दुलच्या बाद झाल्याने फारसा फरक पडला नाही कारण तो बाद झाल्यानंतर पुढच्याच बॉलवर ऋषभ पंतने फोर मारून टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.