मुंबई : श्रीलंकन बॉलरला सळो की पळो करुन सोडणाऱ्या मुंबईकर रोहित शर्मा याची बॅटही कमाईतही आघाडीवर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रोहित त्याच्या बॅटच्या साहाय्याने करोडो रुपये कमवत आहे.
अनेक खेळाडू एखाद्या मोठ्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम घेतात. क्रिकेटपटूदेखील त्यांच्या खेळासोबतच एखाद्या मोठ्या ब्रँडचं प्रमोशन करून पैसे कमावताना दिसतात. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याला जाहिरातीसाठी प्रसिद्ध टायर कंपनी सीएट दरवर्षी ३ कोटी रुपये देत आहे.
भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीही कमाईत आघाडीवर आहे. विराटची बॅट त्याला चांगली कमाईही करून देत आहे. विराटसर्वाधिक कमाई करत आहे. विराट एमआरएफचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. एमआरएफने आठ वर्षांसाठी विराटसोबत १०० कोटींचा करार केला आहे.
केवळ रोहित नाहीतर विराटसह महेंद्र सिंह धोनी आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही जाहिरातीसाठी मोठी रक्कम घेत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटवरही एमआरएफचं स्टिकर होते. सचिन निवृत्त झाल्यानंतर तेच एमआरएफचं स्टिकर आता विराट कोहलीच्या बॅटवर चमकत आहे.
धोनीच्या बॅटवर ऑस्ट्रेलियाच्या स्पार्टन स्पोर्ट्सचा स्टिकर आहे. यापोटी धोनीला दरवर्षी कंपनी ६ कोटी रुपये मिळतात तर तर वेस्टइंडिजचा ख्रिस गेलला ३ कोटी रुपये मिळतात. स्पार्टन स्पोर्ट्सकडून दरवर्षी त्याला ही रक्कम मिळते.