Sachin Tendulkar Birthday: 24 एप्रिल म्हणजेच आजचा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खास दिवसांपैकी एक आहे. कारण भारतात क्रिकेटच्या देवाचा दर्जा मिळालेल्या सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंख्य धावा करणाऱ्या या महान फलंदाजाची उंची जरी कमी असली तरी त्याचे काम एव्हरेस्टपेक्षाही मोठे होते. जगभरातील सर्व मोठ्या संघांविरुद्ध सचिनने शतके झळकावून चाहत्यांची मने जिंकली आहेत. निवृत्तीनंतरही सचिनचे फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही घट झालेली नाही. सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्ताने त्याने पहिले शतक कधी झळकावले होते ते जाणून घेऊया...
सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढील 22 वर्ष सचिनचा क्रिकेटचा देव होईपर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. या काळात त्याने विक्रमांनी अक्षरश: त्याच्या पायावर लोळण घातल होते. सचिनच्या पहिल्या शतकांची सर्व जण चर्चा करत असताना. खुद्द सचिन तेंडुलकरने स्वत: आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत पहिल्या शतकाची आठवण करुन दिली. त्याच बरोबर पहिले शतक आणि 100वे शतक यात काय फरक होता याबद्दल देखील त्याने सांगितले.
सचिन तेंडूलकरने पहिल्या शतकाचा व्हिडीओ शेअर कॅप्शनमध्ये म्हटले की, "माझ्या पहिल्या शतकाची आठवण करुन देणारा माझ्या आयुष्यातील तो एक खास दिवस", असे कॅप्शन देत सचिनने आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनने आयुष्यातील पहिले शतक वयाच्या 17 व्या वर्षी खेळला होता. 1990 मध्ये इंग्लंड विरुद्ध सचिनने 189 बॉलमध्ये 119 धावा काढल्या होत्या..
सचिनने आपल्या कारकिर्दीत 463 हून अधिक एकदिवसीय सामने आणि सुमारे 200 कसोटी सामन्यांमध्ये 384 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18426 हून अधिक धावा केल्या असून ज्यामध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतके केली आहेत. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाही. त्याचबरोबर सचिनने कसोटीत 51 शतके आणि 68 अर्धशतके केली आहेत. ज्यामध्ये त्याने 15921 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
1994 - क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार
1997-98 - राजीव गांधी खेलरत्न, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी भारताचा सर्वोच्च सन्मान
1999 - पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2001 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2008 - पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार
2014 - भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार