Warning About Virat Kohli To Pakistan: पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसाब-उल-हकने विराट कोहलीसंदर्भात पाकिस्तानी संघाला इशारा दिला आहे. विराट कोहली हा मानसिक दृष्ट्या पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा अधिक कणखर ठरु शकतो असं मिसाब म्हणाला आहे. विराट कोहलीचं व्हाइट बॉल क्रिकेटमधील वर्चस्व प्रचंड असून बाबार आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघांने तो ज्या पद्धतीने सामन्यावर परिणाम करु शकतो त्याबद्दल सजग राहणं गरजेचं असल्याचं मिसाबने म्हटलं आहे. 5 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी होणार आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये हा सामना खेळवला जाणार असून त्याआधीच मिसाबने पाकिस्तानी संघाला इशारा दिला आहे.
मिसाबने स्टार स्पोर्ट्सच्या 'प्रेस रुम' कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंच्या मानसिकतेबद्दल भाष्य केलं. ज्या संघाविरुद्ध आपण पूर्वी उत्तम कामगिरी केली आहे त्या संघांविरुद्ध खेळताना खेळाडूची मानसिकता कशी असते याबद्दल बोलताना मिसाबने भारतीय संघ यापूर्वी टी-20 वर्ल्डकपमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या 7 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे.
"खेळाडूंची मसल मेमरी फार स्ट्रॉग असते. तसेच त्यांनी यापूर्वी ज्या संघांविरुद्ध उत्तम कामगिरी केली आहे त्यांच्याविरोधात खेळताना मानसिकता अधिक सकारात्मक असते. अशा सामन्यांवर हे खेळाडू अधिक प्रभाव पाडू शकतात. त्याचा विरोधकांवरही परिणाम होतो. विराटकडे हा असा अॅडव्हान्टेज आहे. तो सुरुातीच्या सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने इतर संघांविरुद्ध आणि पाकिस्तानविरुद्ध खेळला त्यामुळेच त्याने उत्तम खेळी करत विरोधकांना मोठा धक्का दिला," असं मिसाब म्हणाला.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटची कामगिरी कायमच दमदार राहिली आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये विराटने मेलबर्न क्रिकेट ग्राऊण्डवर भारताला पाकिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला होता. त्याने 53 बॉलमध्ये नाबाद 82 धावांची खेळी केली होती. याच खेळीची आठवण करुन देत मिशाबने पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट दमदार खेळी करतो, असं म्हटलं.
"विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध खेळताना फार उत्तम खेळतो. त्याच्यात अशा परिस्थितीमध्ये अधिक आत्मविश्वास दिसून येतो. तो पाकिस्तानविरुद्ध खेळताना अधिक आक्रमक असतो," असं मिसाब म्हणाला. मिसाबने 2017 साली खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचं उदाहरणही दिलं. या सामन्यात मोहम्मद आमिरने कोहलीला 5 धावांवर बाद केलं होतं. विराटला अशाप्रकारे स्वस्तात बाद केल्यास पाकिस्तानच्या विजयाची शक्यता अधिक वाढेल, असंही मिसाब म्हणाला.
"तो असा खेळाडू आहे की मोठी संधी असल्यास तो दबावात न येता त्यामधून प्रेरणा घेत उत्तम खेळी करतो. तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोणाविरुद्धही उत्तम कामगिरी करण्याची त्याची क्षमता आहे. त्याला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला बाद करणे जसं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घडलेलं," असं मिसाब म्हणाला.