T20 World Cup: आयपीएल (IPL) हंगाम संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. यामुळे बीसीसीआयकडे (BCCI) भारतीय संघ निवडण्यासाठी जास्त वेळ नाही. आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे बीसीसीआय काही खेळाडूंना भारतीय संघात स्थान देऊ शकते. दरम्यान भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) काही खेळाडूंना स्थान द्यावं की नाही याबाबत मतांतरं आहेत. विकेटकिपरची जागाही सध्या रिक्त असून, या स्पर्धेत अनेक खेळाडू आहेत. यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटर वेंकटेश प्रसादने (Venkatesh Prasad) संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी कोणत्या खेळाडूंना स्थान मिळायला हवं याबाबत मत मांडलं आहे.
वेंकटेश प्रसादने एक्सवर पोस्ट शेअर करेली आहे. यामध्ये त्याने शिवम दुबे, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सोबत विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात असण्याचं महत्वही सांगितलं आहे. फक्त विकेटकिपर म्हणून कोणाला संधी द्यावी याबाबत त्याला स्पष्टता नाही.
"शिवम दुबे फिरकी गोलंदाजांविरोधात चांगली खेळी करतो. सूर्यकुमार यादव टी-20 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. रिंकू सिंगकडे सामना संपवण्याचं चांगलं कौशल्य आहे. जर भारतीय टी-20 संघात या तिघांना स्थान मिळालं तर उत्तम होईल. विराट आणि रोहित असताना आता फक्त विकेटकिपर फलंदाजाचा प्रश्न उरतो. हे कसं काय उलगडेल हे पाहावं लागेल," अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
Shivam Dube for his striking ability against spinners, Surya for being the best T20 international batter and Rinku Singh for his exceptional finishing ability. It will be great if India finds a way to have these 3 in the 11 in the T20 WC. With Virat and Rohit , this will leave…
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) April 8, 2024
विशेष म्हणजे या पोस्टमध्ये वेंकटेश प्रसादने हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, के एल राहुल यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सध्याच्या आयपीएल हंगामात हे तिघेही आपल्या फलंदाजीत फार कमाल दाखवू शकलेले नाहीत. त्यांची खराब कामगिरी पाहूनच वेंकटेश प्रसादने त्यांना संघात स्थान दिलं नसावं.
दरम्यान शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्याबद्दल बोलायचं गेल्यास त्यांनी आपण टी-20 साठी अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्यांनी सर्वांना प्रभावित केलं आहे. आपल्या या खेळीच्या आधारे जर त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही.