Ramiz Raja on Beating India: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतीय संघाबद्दल एक विधान केलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये पराभूत करणं कठीण असल्याचं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी भारताला कसं पराभूत करता येईल यासंदर्भातील एक ट्रीकही इतर संघांना सांगितली आहे.
रमीझ राजा यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं विश्लेषण करताना कर्णधार रोहित शर्मा सर्वच सामन्यांमध्ये संघाला उत्तम सुरुवात करुन देत आहे. रोहित शर्माचं काऊंटर अटॅक धोरण फारच प्रभावशाली असल्याचं रमीझ राजा यांनी म्हटलं आहे. भारताकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत, असंही रमीझ राजा यांनी नमूद केलं आहे.
"यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये, रोहित शर्माचा पॉवर प्लेमधील स्क्राइक रेट 140 चा आहे. त्याने आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये 9 सिक्स मारले आहेत. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज उत्तम आहेत. भारताची फलंदाजी अगदी तळापर्यंत आहे. भारताला पराभूत करणं कठीण आहे," असं रमीझ राजा म्हणाले आहेत. मात्र पुढे बोलताना, "कोणीतरी त्यांच्यापेक्षा सरस खेळ केला तरच त्यांना पराभूत करता येईल," असंही रमीझ राजा यांनी भारताला पराभूत करण्यासंदर्भात म्हटलं आहे. युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रमीझ राजा यांनी आपलं मत मांडलं आहे.
सध्या आपल्या कॉमेंट्रीमुळे चर्चेत असलेल्या रमीझ राजा यांनी आतापर्यंत केवळ भारतीय संघानेच परिपूर्ण कामगिरीचं प्रदर्शन केल्याचंही म्हटलं आहे. "आतापर्यंतच्या वर्लड कप स्पर्धेमध्ये भारत वगळता कोणत्याही संघाने परिपूर्ण कामगिरी केलेली नाही. त्यांचे अव्वल 5 फलंदाजांची सरासरी 50 ची आहे. ते षटकार मागवण्यासाठी सक्षम आहे आणि त्यांची सरासरीही उत्तम आहे. भारतीय फलंदाजीमध्ये कौशल्य आणि दर्जा दोन्ही गोष्टी आहेत. ते फार स्मार्टपणे क्रिकेट खेळतात. त्यांच्या गोलंदाजीबद्दलही हेच म्हणता येईल," असं रमीझ राजा म्हणालेत.
"बांगलादेशची गोलंदाजी उत्तम नव्हती पण विराट कोहली प्रत्येक चेंडू फार स्मार्टपणे खेळत होता. विराट हा फार मोठा खेळाडू आहे. विराट कोहली मैदानात असणं हे क्रिकेटसाठी फार महत्त्वाचं आहे," असंही रमीज राजा म्हणाले. विराट कोहलीने 97 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या. विराटचं हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील 49 वं शतक आहे. विराट आता सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून केवळ 1 शतकं दूर आहे.