Job News : सतत कामाचा व्याप, सतत Target चा ताण आणि त्यात वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक या साऱ्याचा कळत नकळत कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मागील काही वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये ही परिस्थिती आणि एकंदर हाच trend तग धरत असून, त्याचे अनेक नकारात्मक परिणामही समोर येत आहेत. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी घडली असून, हा सर्व प्रकार आता समोर आला आहे.
प्रमाणाहून जास्त काम केल्यामुळं आणि शरीराला अपेक्षित विश्रांती न दिल्यामुळं एका कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढावला आहे. चीनमध्ये ही खळबळजनक घटना घडली असून, इथं चीनमधील 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा सलग 104 दिवस काम केल्यामुळं मृत्यू ओढावला. हा कर्मचारी रंगकाम करत असल्याची माहिती चीनमधील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं प्रसिद्ध करत कर्मचाऱ्याचं नाव अबाओ असल्याचं सांगितलं.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार फेब्रुवारी 2023 पासून हा कर्मचारी एका सक्तीच्या कराराअंतर्गत हे काम करत होता. पण, यानंतर प्रकृती अस्वास्थ्य आणि संसर्गामुळं परिस्थिती बिघडली आणि जून महिन्यात त्याचा मृत्यू ओढावला. चीनमध्ये असणाऱ्या झेजिआंग प्रांतातील जोशुआन इथं त्यानं हे काम हाती घेतलं होतं. त्याची दिनचर्या आणि कामाचं स्वरुप अतिशय मन हेलावणारं होतं. फेब्रुवारी ते मे या महिन्यांदरम्यान त्यानं सलग काम केलं आणि यादरम्यान त्यानं फक्त 6 एप्रिल रोजीच सुट्टी घेतली.
25 मे रोजी हा कर्मचारी आजारी पडला आणि तेव्हापासूनच त्याची प्रकृती अतिशय वेगानं खालावली. तीन दिवसांनी त्याच्या सहकाऱ्यांनी त्यावला रुग्णालयात दाखल केलं जिथं त्याला फुफ्फुसांचा संसर्ग आणि श्वसनविकार झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नांनंतरही हा कर्मचारी जीवाला मुकला.
अबाओच्या निधनाती माहिती मिळताच त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी त्याच्या मालकाविरोधात कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. एकिकडे कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कंपनीवर गंभीर आरोप केले असतानाच दुसरीकडे आता त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळं झाला ही कारणं आता तपासातून समोर येत आहेत.
दरम्यान, अबाओच्या कामाचे तास योग्य असून, जास्तीचं काम हे ऐच्छिक स्वरुपातील असल्याचं स्पष्टीकपण कंपनीनं दिलं. दरम्यान या कर्मचाऱ्यानं त्याच्या आरोग्यविषयक व्याधींकडे दुर्लक्ष करत उपचार घेतले नसल्याचंही कंपनीनं सांगितलं. पण, न्यायसंस्थेनं मात्र कुटुंबीयांच्या बाजूनं निकाल देत या कर्मचाऱ्याच्या निधनासाठी कंपनीचाही 20 टक्के दोष असल्याचं सांगत त्याच्या कुटुंबाला 400,000 yuan (साधारण ₹47,19,036) देणं बांधिल असल्याच्या सूचना कंपनीला केल्या. यावेळी चीनमध्ये कामाते अतिरिक्त तास आणि एकंदर नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या इतर गंभीर प्रश्नांवरही न्यायसंस्थेनं कटाक्ष टाकला.