बॉलिवूड अभिनेता राहुल बोसने (Rahul Bose) 'बुलबल' (Bulbbul) चित्रपटात तृप्ती डिमरीसह (Tripti Dimri) काम केलं. या चित्रपटात राहुल बोस ठाकूर इंद्रनिल चौधरी आणि महेंद्र चौधरी अशा दुहेरी भूमिकेत होता. चित्रपटातील एका सीनमध्ये राहुल बोसला तृप्ती डिमरीवर बलात्कार करायचा होता. हा सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो. प्रचंड हिंसक आणि अंगावर काटे आणणारा हा सीन आहे. दरम्यान हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला, तसंच असे संवेदनशील सीन शूट करण्यावर राहुल बोसने भाष्य केलं आहे.
राहुल बोसने यावेळी अशा गोष्टी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने हाताळणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं. राहुल बोसने हा शूट करण्याआधी तृप्ती डिमरी अस्वस्थ वाटणार नाही आणि प्रत्येकाच्या त्यात भावना आहेत याची काळजी घेतली. "तृप्ती डिमरी अप्रतिम होती. चित्रपटात जुळ्या भावाचा एक सीन होता जो तिच्यावर बलात्कार करतो आणि तिला मारतो. तिचा बेडवरच मृत्यू होतो. हे फार भयानक आहे."
पुढे त्याने सांगितलं की, "आम्ही रिहर्सल करत होतो, यानंतर आम्ही एकत्र बसून गप्पा मारल्या. मी तिला म्हणालो, राहुल हा तुझा सुरक्षित शब्द आहे. तुझ्यावर हल्ला झालेला असो किंवा नसो पण हे संताप आणणारं आहे. प्रत्येकाला ही भीती आहे की, एक दिवस हे माझ्यासोबत होऊ शकतं. एकदा कॅमेरा सुरु झाल्यानंतर आणि अॅक्शन म्हटल्यानंतर मी जनावर होईल. त्यामुळे जर तुला बेडवर असुरक्षित वाटलं आणि ट्रिगर झालं तर एका सेकंदात राहुल म्हण".
यावेळी राहुल बोसने तृप्ती डिमरी कणखर आणि उत्तम अभिनेत्री असल्याचं कौतुक केलं. बुलबुल चित्रपटात तिच्यासह काम करायला मला फार आवडलं असंही त्याने सांगितलं.
बुलबुलची कथा एका तरुण वधूभोवती फिरते, जी एका गूढ स्त्रीमध्ये रुपांतरित होते. आपली वेदनादायक पार्श्वभूमी लपवताना ती कुटुंबाचा ताबा आपल्याकडे होते. दुसरीकडे त्यांच्या गावात हत्या होत असतात. भूत या सर्व हत्या करत असल्याची भिती सर्वांच्या मनात असते.
या चित्रपटात अविनाश तिवारी, पाओली दाम आणि परमब्रता चट्टोपाध्याय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बुलबुलचे लेखन आणि दिग्दर्शन अन्विता दत्त यांनी केले होते. क्लीन स्लेट फिल्म्स अंतर्गत अनुष्का शर्मा आणि कर्णेश शर्मा यांनी याची निर्मिती केली होती. हा चित्रपट 1880 च्या बंगाल प्रेसिडेन्सीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे.