मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देणारा अभिनेता इरफान खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानच्या आईचं निधन झालं होतं. लॉकडाऊनमुळे इरफान त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता.
इरफानची आई सईदा बेगम या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जयपुरच्या आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. मात्र इरफानने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या आईचं शेवटचं दर्शन घेतलं होतं. आईच्या निधनानंतर इरफानची तब्येत बिघडली आहे.
इरफानला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर आहे. परदेशातून कॅन्सवर उपचार करुन आल्यानंतर इरफान रुटीन चेकअपसाठी कोकिलाबेन रुग्णालयात जातो. मिळालेल्या माहितीनुसार, आता इरफानला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. 2017च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान कामातून ब्रेक घेऊन परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता. इरफानने स्वत: त्याच्या आजाराबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.