Vijay Varma on Tamannaah: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचा नववर्षाच्या पार्टीत किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण गेल्या पाच महिन्यांपासून दोघांनीही या चर्चांवर भाष्य करणं टाळलं होतं. पण नुकतंच तमन्ना भाटियाने नात्यावर शिक्कामोर्तब केलं असून आपण आणि विजय वर्मा नात्यात असल्याची कबुली दिली आहे. तमन्नाने विजय वर्मा आपलं आनंदाचं ठिकाण असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत तिने आपण डेटिंग करत असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आता विजय वर्मानेही त्यावर प्रतिक्रिया दिली असून आपल्या आयुष्यात सध्या फार प्रेम असल्याचं म्हटलं आहे.
Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने आपला प्रियकर विजय वर्मा याच्याबद्दल जाहीरपणे भाष्य केलं आहे. तसंच आपण एकमेकांना डेट करत असल्याचं यावेळी तिने सांगितलं. दरम्यान, जेव्हा विजय वर्माला त्याच्या खासगी आयुष्यातील प्रेमाबद्दल लोकांना असणाऱ्या उत्सुकतेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने उत्तर दिलं. तो म्हणाला की "जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तुम्ही त्यावर भाष्य करता. पण सध्या मी इतकचं सांगू शकतो की माझ्या आयुष्यात सध्या फार प्रेम आहे आणि मी आनंदी आहे". तसंच आपल्या खासगी आयुष्यापेक्षा, कामाने बोलावं असंही त्याने म्हटलं आहे.
Film Companion शी बोलताना तमन्ना भाटियाने सांगितलं की, "तो (विजय वर्मा) असा एक व्यक्ती आहे ज्याच्याशी मी फार नैसर्गिकपणे जोडली गेली आहे. माझ्याकडे येताना त्याने कोणतीही बंधनं ठेवली नव्हती, त्यामुळे मलाही फार सहज झालं होतं. महिला फार यशस्वी असली की आपल्याकडे एक समस्या असते. प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील असं वाटू लागतं. तुम्हाला खडतर प्रवास करण्याची गरज नाही. जसे आहात तसेच राहा . मैत्री हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्यासोबत तुम्ही हसू शकता. ज्याच्यासह तुम्ही सर्वात मोठ्या आवाजात कोणत्याही गोष्टीवर हसू शकता, जिथे तुमचा आवाज वेगळा म्हणजे प्राण्यांसारखा असतो. तो एक व्यक्ती आहे जिची मला मनापासून काळजी आहे. ते माझे आनंदी ठिकाण आहे".
दरम्यान तमन्ना आणि विजय Lust Stories 2 मध्ये एकत्र दिसणार आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.