90 किलोचा डॉल्फिन कापून खाल्ला! चौघांविरोधात गुन्हा दाखल; UP मधील धक्कादायक प्रकार

UP Crime : यमुना नदीत माशांच्या शिकारीसाठी गेलेले मच्छिमार शिकार करत असताना सुमारे 90 किलोचा डॉल्फिन मासा त्याच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर मच्छिमार डॉल्फिन माशासह गावात पोहोचले आणि त्याचे तुकडे करून आपापसात वाटून घेतले आणि खाऊन टाकले.

आकाश नेटके | Updated: Jul 25, 2023, 04:09 PM IST
90 किलोचा डॉल्फिन कापून खाल्ला! चौघांविरोधात गुन्हा दाखल; UP मधील धक्कादायक प्रकार title=
(फोटो सौजन्य - PTI)

Fishermen catch dolphin from Yamuna : डॉल्फिन (dolphin) ही माशाची प्रजाती ही त्यांच्या शांत स्वभावासाठी ओखळली जाते. ही फारच दुर्मिळ प्रजाती असून ते सहज दिसत नाहीत. डॉल्फिन भारतातील माशांच्या संरक्षित प्रजातीत येतात. त्यामुळे त्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उत्तर प्रदेशात (UP Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे मच्छिमारांनी (Fisherme) डॉल्फिन मारुन त्याला खाल्ले आहे. मच्छिमांरांनी डॉल्फिन पकडलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर वनविभागाला या घटनेची माहिती मिळाली. तक्रारीनंतर पोलिसांनी (UP Police) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे काही मच्छिमारांनी डॉल्फिनची शिकार केली आहे. मच्छिमारांनी फक्त डॉल्फिनची शिकारच केली नाही तर त्याला मारून खाल्लेही आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत डॉल्फिनला घेऊन जात असतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खबळ उडाली. वनविभागाला हा सगळा प्रकार कळताच त्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार पैकी एका आरोपीला अटक केली आहे.

कौशंबी जिल्ह्यातील चैल येथील वनविभागातील अधिकारी राजेंद्र कुमार यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर चार मच्छिमारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुना नदीत मासेमारी करताना आरोपी मच्छिमारांनी 90 किलोंचा डाल्फिन पकडला. त्यानंतर त्याची हत्या करुन त्याचे मांस खाल्लं. पिपरी पोलीस ठाण्याचे प्रमुख श्रवण कुमार सिंह यांनी सांगितले की, 22 जुलै रोजी सकाळी नसीरपूर गावातील पाच मच्छीमार यमुना नदीत मासेमारी करत असताना एक डॉल्फिन त्यांच्या जाळ्यात अडकला होता. त्यांनी डॉल्फिनला खांद्यावरुन नेऊन त्याला मारले आणि नंतर एका घरात नेऊन शिजवून खाल्ले.

या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चैल रेंजर रवींद्र कुमार आणि बीटचे प्रभारी वननिरीक्षक राम प्रकाश रावत हे घाई घाईने नसीरपूर गावात पोहोचले. त्यांनी गावातल्या लोकांची झडती घेतली आणि रणजित नावाच्या मच्छिमाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, इतर आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणी वनविभागाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस वन्यजीव अधिनियम-1972 अन्वये कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर यांनी दिली. आरोपींनी डॉल्फिन खाल्ल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "सध्या त्याचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केल्यानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार आहेत."