हृदयद्रावक Video; 'भुई दणाणली आणि गाव...', इरसालवाडीत नेमकं काय घडलं सांगताना महिलेनं फोडला टाहो

Irsalwadi Landslide : इरसालवाडी येथे घडलेल्या भीषण घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण बेपत्ता आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु असून पावसामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.

आकाश नेटके | Updated: Jul 20, 2023, 01:35 PM IST
हृदयद्रावक Video; 'भुई दणाणली आणि गाव...', इरसालवाडीत नेमकं काय घडलं सांगताना महिलेनं फोडला टाहो title=

Khalapur Irsalwadi Landslide : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. अशातच बुधवारी रात्री उशिरा रायगडमधील (Raigad) इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडीवर (Irsalwadi Landslide) दरड कोसळल्यामुळं मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहे. 250 लोकसंख्या असलेल्या गावातील 70 ते 80 लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रशासनानं दिलं आहे. तर उर्वरित लोकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अनेक कुटुंबे यामध्ये गाडली गेली आहेत. त्यांचे काही कुटुंबिय लवकर घरातून बाहेर पडू शकल्याने बचावले आहेत. मात्र रात्री घडलेला प्रसंग सांगताना या महिलांनी टाहो फोडला आहे. 

"साडेदहा वाजता भुई दणाणली आणि गाव चेपत आलं. आम्ही जीव घेऊन पळालो, आता तिथून आम्हाला इथं परत आणलं. एकदम जोराच आवाज झाला आणि आम्ही तिथून पळालो. आमच्या घरातील माणसं होतं. त्यांनी आम्हाला उठवलं आणि शेतीकडे पळालो. त्यानंतर आम्हाला खाली आणण्यात आलं. एकदम जोरात आवाज आला म्हणून आम्ही पळालो. रात्रभर आम्ही पाण्यातच बसलो होतो. सकाळी वाडीत जाऊन नेमकं काय घडलं ते बघायला जाऊ, असा विचार आम्ही केला पण आता फक्त मातीच राहिली. आमच्या कुटुंबातील मोठ्या दीराचं सगळं कुटुंबच चेपलं. सगळं आख्ख गावचं गेलं आहे. काहीच राहिलं नाही," असं या घटनेतून बचावलेल्या महिलेनं सांगितलं आहे.

"माझा पोरगा तिथे अडकला आहे. एकाएकी काय झालं हे आम्हालाही समजलं नाही. माझा पोरगा सापडत नाही. दीराच्या कुटुंबातील कोणीही वाचलं नाही," असे आणखी एका महिलेनं सांगितलं.

इरसालवाडी दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू - देवेंद्र फडणवीस

"वाडीत वास्तव्यास असणाऱ्या 48 कुटुंबांपैकी 25 ते 28 कुटुंबं बाधित झाल्याचा अंदाज आहे. 228 पैकी 70 नागरिक घटनेवेळी सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. 21 लोक जखमी असून 17 लोकांवर तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केले आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार 10 लोकांचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

इरसालवाडी दरड प्रवण क्षेत्राच्या यादीत नव्हतं - देवेंद्र फडणवीस

"इरसालावाडी गाव चौक मानिवली ग्रामपंचायतीमधल्या डोंगरवस्तीत आहे. इरसाल गडाच्या डोंगरकपारीत वसलेली वाडी आहे. तिथे वाहनं जाण्यासाठी रस्ता नाही. दूरध्वनी, मोबाईल पोहोचणे कठीण आहे. ठाकर लोकांची इथे प्रामुख्याने वस्ती आहे. हे ठिकाण संभाव्य दरड प्रवण क्षेत्रांच्या यादीत नाही. यापूर्वी या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडली नाही," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.