कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोंडसूख घेतलं. आता युती झाल्यामुळे टीका कुणावर करावी, हेच समजत नाही, कारण समोर कुणीच शिल्लक नाही, असं ते म्हणाले.
आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यावरही त्यांनी टीका केली. आता गिरीश महाजन दिसले की विरोधकांना धडकी भरते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रोज एकमेकांना अजून पक्षातच आहात ना? भाजप-शिवसेनेत गेला नाहीत ना? असा प्रश्न विचारत असल्याचा टोमणाही उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच आम्ही युती का केली? याचं उत्तर द्यायची गरज नसल्याचं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं.