प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाकडून (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावले असा गौप्यस्फोट सदा सरवणकर यांनी केला आहे.
"मला मनोहर जोशींनीच मातोश्रीवर उमेदवारी मागायला ताकद दाखवण्यास सांगितले होते. मात्र मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली असे सांगत त्यांच्या घरावर हल्ला करायला सांगितले असा उद्धव ठाकरे यांचा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला. तर संजय राऊत यांनी जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका असा फोन केला होता. त्यामुळे मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला," अशी जाहीर कबुली सदा सरवणकर यांनी कोल्हापुरात दिली आहे.
जाळ्यात अडकवून उमेदवारी नाकारायचे काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोपही सदा सरवणकर यांनी केला आहे. एवढंच नाही तर राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राचे भले होईल असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केल्याने त्यांना दसरा मेळाव्यात येऊ दिले नसल्याचा आरोपही सदा सरवणकर यांनी केला.
राष्ट्रवादीसोबत युती तोडली नाही म्हणून पक्षाची वाताहत - सदा सरवणकर
"आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत पैशांसाठी गेलो, हे धादांत खोटे आहे. अडीच वर्षांत ठाकरे आमदारांना भेटले नाहीत. मग पक्षाचे काम कसे करणार? कुटुंबप्रमुखाचे धोरण चांगले असेल तर घर टिकते. राष्ट्रवादीशी युती तोडण्याची आम्ही ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. ती न तोडल्यानेच पक्षाची वाताहत झाली. आदित्य ठाकरे पावलोपावली आमदारांवर अन्याय करत होते. सेनेच्या आमदारांचे पंख छाटण्याचे पक्षाचे धोरण बनले होते. उद्धव ठाकरेंना आदित्यना मोठे करायचे होते. ठाकरे आमदारांच्या चेहऱ्याकडेही पाहायचे नाहीत. त्यांची भेट मिळत नसल्याने शिवसैनिकांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाला साथ दिली," असे सदा सरवणकर म्हणाले.
"माझ्याकडे उमेदवारीसाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली होती. ती मी देऊ शकत नसल्याने आदेश बांदेकरांना मातोश्रीतून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिवसैनिकांची कोंडी करण्याची व त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम बाळासाहेबांच्या काळात कधी झाले नाही," असेही सरवणकर म्हणाले.