'राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली'

नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

Updated: Oct 25, 2019, 07:36 PM IST
'राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली'
संग्रहित फोटो

नाशिक : विधानसभा निवडणूक २०१९ चे निकाल गुरुवारी जाहीर झाले. निकालात महायुतीने बाजी मारली असली तरी राष्ट्रवादीनेही अनपेक्षित यश मिळवलं आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी निवडणूकीत नाशिकच्या येवला मतदारसंघातून विजयाची मोहर उमटवली आहे. विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी या निकालाने अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गेली अडीच वर्षे मला सरकारी पाहुणचार घ्यावा लागला, त्यामुळे नाशिककडे दुर्लक्ष झाले. अनेक ठिकाणी त्यामुळे संस्थान गेली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त व्यक्त केली. निवडणूकीत सर्वांनी मनापासून साथ दिल्याने, नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

शरद पवारांनी महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला आहे. या वयातही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पवार साहेबांनी या वयात दिलेली झुंज पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. म्हणूनच जनतेने साथ दिल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीने जी ताकद गमावली होती ती परत आणून आम्ही पुन्हा एक नंबर असल्याचे सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली असल्याचे आनंदोद्गार त्यांनी काढले.

  

आमचे सहा आणि एक काँग्रेसचा एक आमदार ही शक्ती कमी नाही. आम्ही सर्व आमदार जनतेच्या प्रश्नावर एक मुखाने आवाज उठवू. जिल्ह्यातील प्रश्न सोडण्यासाठी भाजपा, शिवसेनेच्या लोकांना सोबत घेऊन काम करु. आम्ही जनतेच्या सुख दुःखात सहभागी असून, जनतेची सेवा करायची असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.