मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे यांनी आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. त्यावेळी हे आवाहन केले.
आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भेट दिली. गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.#CoronaVirusUpdates #LetsFightCorona pic.twitter.com/4CO6yDzjSz
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 21, 2020
टोपे यांनी गर्दी नियंत्रणाबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असं आवाहन त्यांनी केले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. मुंबई महानगर प्रदेशसह चार शहरे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर अनेक लोक भीतीने आपल्या गावी परतत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.
रेल्वे स्टेशन, बस थांबे आणि अनेक ठिकाणी गावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसत आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, संध्याकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीएसएमटी स्थानकाला भेट देत आढावा घेतला. लोकलमध्ये आता २० ते २५ टक्के गर्दीच आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १८६१ प्रवासी आले आहेत. लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी ट्विट केली आहे. कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत.पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असेही आवाहन केले आहे.