मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढतो आहे. आज दिवसभरात 3307 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 16 हजार 752 इतकी झाली आहे. आज राज्यात एका दिवसांत 114 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत 5651 जण दगावले आहेत.
बुधवारी राज्यात 1315 रुग्ण बरे झाले. तर आतापर्यंत एकूण 59 हजार 166 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
मुंबईत आतापर्यंत 61 हजार 587 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 31 हजार 338 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत आतापर्यंत 3244 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत 26 हजार 997 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता 29 दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.43 टक्क्यांवर आहे.
काही दिवसांपूर्वी धारावीमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र आज धारावीत 17 नवे रुग्ण वाढले आहेत. धारावीत आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2106 झाली आहे. धारावीत आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 78 झाली आहे. दुसरीकडे दादरमध्ये 13 रुग्ण वाढले. तर माहिममध्ये २७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
राज्यात 5 लाख 82 हजार 699 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सध्या 27 हजार 582 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण, रिकव्हरी रेट 50.68 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 4.84 टक्के आहे.