ना महाराष्ट्रात, ना भारतात...सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती? राज ठाकरेंनी घेतलं नाव

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना गावातील स्वच्छतांकडे लक्ष देण्याच आवाहन करताना आपण पाहिलेली सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती होती हे सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2024, 04:01 PM IST
ना महाराष्ट्रात, ना भारतात...सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती? राज ठाकरेंनी घेतलं नाव title=

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनेच्या पदाधिकाऱ्यांना गावं स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलं आहे. गावांची स्वच्छता हा आपला अजेंडा असला पाहिजे असं ते पुण्यातील मेळाव्याल बोलताना म्हणाले आहेत. मला एकच सूचना करायची आहे. गाव स्चच्छ ठेवा इतकंच सांगणं आहे. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण पाहिलेल्या सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायतीचाही उल्लेख केला. 

"मी सगळा महाराष्ट्र फिरलो, अनेक गावात, तालुक्यात गेलो. तिथे स्वच्छतेची दुरावस्था दिसली. सांडपाणी त्यातून मुलं, डुक्कंर फिरत होती. त्या अस्वच्छ वातावरणामुळे मनही अस्वच्छ होतं. जगण्याची इच्छा आजुबाजूच्या वातावरणामुळे निर्माण होते. ग्रामीण भागातील तरुण, तरुणी शहरात यायला पाहत आहेत आणि शहरातील परदेशात जात आहे. शहरातील तरुण, तरुणी परदेशात शिक्षण मिळत नाही म्हणून जात आहेत का? सभोवतालचं वातावरण चांगलं मिळत नसल्याने ते जात आहेत. जगावं असं वातावरण मिळत नसल्याने ते परदेशातील मार्ग स्विकारत आहेत. तिथे काय सगळेच चांगल्या नोकऱ्या करत आहेत असा भाग नाही. लपूनछपून जायचं आणि तिथे काय स्वीपर म्हणून काम करायचं. स्वच्छता हा पहिला अजेंडा असला पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले. 

"माझ्या शालेय जीवनात मी पहिल्यांदा पाहिलेली भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणजे रामगढ. त्या गावातील सर्वात श्रीमंत ठाकूर आहे, आणि घरात लाईट नाही. पण गावात टाकी आहे. पाणी काय त्याचा बाप चढवणार आहे? अशा प्रकारच्या गोष्टी मनसेच्या व्यक्तीकडून होता कामा नये," असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 

स्वच्छतेकडे लक्ष द्या

"मला एकच सूचना करायची आहे. बाकी तुम्ही हुशार आणि प्रामाणिक आहात. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छुक आणि उत्साही आहात. गाव स्चच्छ ठेवा इतकंच सांगणं आहे. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या. आपण 16 मिनिटांची एक डॉक्युमेंट्री केली होती. त्याच्यात हा विषय मांडला होता. आपल्या आजुबजूचा परिसर स्वच्ठ ठेवण्यासाठी इच्छा लागते. तितकी रोगराईपासून मुक्ती होते. गावात छान वाटलं पाहिजे. या गावात राहतो याचा अभिमान वाटला पाहिजे," असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 

"तुमचं गाव चांगलं स्वच्छ ठेवा. वातावरण बदलून टाका. माता-भगिणींना राहावंसं वाटलं पाहिजे. घरी बोलावंसं वाटलं पाहिजे. ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांचा सूड घेऊ नका, त्यांनाही आपली चूक झाली असं वाटलं पाहिजे. असं वातावरण निर्माण केल्यानंतर कोणीही तेथून मनसेचा झेंडा काढू शकणार नाही," असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

'स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी'

"मनसेच्या हातात असणाऱ्या ग्रामपंचायतीतील सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला मी 5 लाखांचा निधी देईन, कमी वाटलं तर जास्त देईन," अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. या लोकांसारखं नाही, पुणे शहरासाठी 50 हजार कोटी जाहीर करत आहेत. घंटा आहेत का तुझ्या हातात. उगाच बुडबुडे फोडायचे. जे आवाक्यात असेल ते करा असा टोलाही त्यांनी लगावाला. 

22 जानेवारीला राज्यात चांगले कार्यक्रम आयोजित करा

22 जानेवारीला अयोध्या राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. राम मंदिराच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. राम मंदिर होणं यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात जे चांगलं करता येईल त्या सर्व गोष्टी करा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.