महाराष्ट्रात नाशिकमध्येच का भरतो कुंभमेळा?

नाशिकच्या कुंभाचा इतिहास काय आहे. तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी का आयोजित केला जातो? उत्सुकता म्हणून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच... तर त्याचंच हे उत्तर... 

Updated: Jul 14, 2015, 11:47 AM IST
महाराष्ट्रात नाशिकमध्येच का भरतो कुंभमेळा? title=

नाशिक : नाशिकच्या कुंभाचा इतिहास काय आहे. तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी का आयोजित केला जातो? उत्सुकता म्हणून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच... तर त्याचंच हे उत्तर... 

नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये आजपासून पुरोहित संघाच्या ध्वजारोहाणाने सुरुवात झालीय. भारतात अलाहाबाद, हरिद्वार, उज्जेन आणि नाशिक या चारच ठिकाणी कुंभमेळा भरतो. 

सिंह राशीत जेव्हा गुरुचे आगमन होते त्यावेळी नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरतो... ग्रहांची ही स्थिती दर बारा वर्षांनी येते. या कुंभाची रंजक अशी पौराणिक कथा सांगितली जाते. देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरु असताना दानव आक्रमक झाले. त्यावेळी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून राहूच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेतला आणि इंद्राचा मुलगा जयंत याच्याकडे सोपविला. तो कलश घेऊन जयंत स्वर्गाच्या दिशेने जात असताना त्याने हरिद्वार, उज्जेन, अलाहाबाद, नाशिक अशा चार ठिकाणी तो कलश ठेवला असता अमृताचे काही थेंब खाली पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळी जी ग्रहस्थिती होती तशी ग्रहस्थिती दर बारा वर्षांनी येते आणि त्यावेळी त्या-त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो

कुंभमेळा जसा अनादिकालापासून भरतो तसेच त्यावरुन होणारे वादही तेवढेच प्राचीन आहेत. १७६० मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव या दोन पंथांच्या साधुंमध्ये झालेल्या वादातून मोठ्या प्रमाणात संहार झाला. या  संघर्षात सोळाशेहून अधिक साधूंना आपले प्राण गमवावे लागलेत. साधूंचा हा वाद पेशव्यांच्या दरबारात गेला. पेशव्यांनी १७७२ मध्ये वादाचा निवाडा करत त्रंबकेश्वरला शैव पंथीय तर नाशिकमध्ये भगवान विष्णूला पंथीयांनी स्नान करावे, असा आदेश दिला तेव्हा पासून आजपर्यंत त्यांचा आदेशाच पालन केलं जातंय.

कुंभमेळाच्या मुख्य स्थानापासून १८ मैल अंतरावर जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते, अशी श्रद्धा असल्याने नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कुंभपर्व काळात पर्वणीच्या दिवशी शाही स्नान केले जाते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.