मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
बीसीसीआयच्या निवेदनात काय?
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जसप्रीत बुमराहला ICC पुरुषांच्या T20 वर्ल्डकप संघातून वगळले आहे. बुमराहच्या फिटनेसबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. बुमराह पाठदुखीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून बाहेर पडला होता. पण आता बीसीसीआयने त्याला विश्वचषकातून वगळले आहे. आता बुमराहच्या जागी दुसऱ्या खेळाडूचं नाव लवकरच जाहिर करण्यात येईल अशी माहिती देखील बीसीसीआयने दिली आहे.
इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंज देत होता. त्यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाऊ शकला नाही. आशिया कप 2022 मध्येही भारताला बुमराहची कमतरता स्पष्टपणे दिसून आली होती.
दरम्यान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुमराह विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र आज बीसीसीआयने टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याची औपचारिक घोषणा केली आहे. त्यामुळे आता
बुमराहच्या जागी विश्वचषक संघात कोणाला संधी दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'या' खेळाडूंना मिळणार संधी
टीम इंडियाला आता वर्ल्डकपमध्ये त्यांच्या अनुभवी गोलंदाजाशिवायच मैदानात उतरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराहच्या जागी आता राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेल्या मोहम्मद शमीला संघात स्थान मिळवू शकतो. तसेच मोहम्मद सिराजचे नावही समोर आले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही सिराजची निवड झाली आहे. विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये सिराजला स्थान मिळण्याची खात्री आहे.
बीसीसीआय यावर आता बुमराहच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.