ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा विजय झाला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या १५९ धावांचे आव्हान भारताने १८. ५ ओव्हर मध्ये पूर्ण केले. भारताने १६२ धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात धमाकेदार झाली. पहिल्या विकेटसाठी सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात ७९ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्माने आक्रमक खेळी केली. रोहित शर्मा ५० धावा करुन बाद झाला. त्याने २९ चेंडूच्या मदतीने ५० धावा केल्या. यात ४ सिक्सर आणि ३ चौकारांचा समावेश होता. रोहितच्या पाठोपाठ शिखर धवनही ३० धावा करुन बाद झाला.
#TeamIndia win by 7 wickets. Level the three match series 1-1 #NZvIND pic.twitter.com/kudlWM0r9X
— BCCI (@BCCI) February 8, 2019
धवन बाद झाल्यानंतर आलेल्या विजय शंकरला चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. विजय शंकर १४ धावा करुन बाद झाला. यानंतर आलेल्या धोनी आणि ऋषभ पंत या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. रोहितनंतर ऋषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर धोनीने २० धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोधी, लॉकी फरग्युसन, डॅरिल मिचेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
याआधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सर्वाधिक कॉलिन डि ग्रॅण्डहोम याने ५० तर रॉस टेलरने ४२ धावा केल्या. तर केन विलियमसनने २० धावा केल्या. भारताकडून कृणाल पांड्याने ३ विकेट घेतल्या. तर खलील अहमदने २ तसेच भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली. सर्वाधिक ३ विकेट घेतलेल्या कृणाल पांड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी केली आहे. यामुळे मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.