Sunil Gavaskar on R Ashwin: भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) अनेक खेळाडू हे फक्त मैदान नाही तर मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. युवराज, सेहवाग, सचिन, सौरभ असे काही माजी खेळाडू पाहिले तर त्यांच्यातील मैत्री अद्यापही कायम असून दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचं दिसतं. पण भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनचं (R Ashwin) मात्र वेगळं मत आहे. याचं कारण एका मुलाखतीत त्याने भारतीय संघातील खेळाडू आपले फक्त सहकारी आहेत, मित्र नाही असं विधान केलं होतं. त्याच्या या विधानाने माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) मात्र नाराज झाले आहेत. हे फार वेदनादायी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. "हे फार वाईट आहे. कारण खेळाडूंनी त्यांचं मैदानातील कर्तव्य संपल्यानंतर मैदानाबाहेर एकमेकांशी संवाद साधला पाहिजे," असं ते म्हणाले आहेत.
भारतीय संघातील खेळाडू मित्रांप्रमाणे एकमेकांशी बोलू शकत नाहीत याचं सुनील गावसकर यांना फार वाईट वाटत आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. प्रत्येक खेळाडूला वेगळी रुम दिली जात असल्याने यात भर पडत असावी असंही मत त्यांनी मांडलं आहे.
"हे फार वेदनादायी आहे. कारण खेळ संपल्यानंतर तुम्ही एकत्र आलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही खेळावर चर्चा नका करु. मात्र आवडते चित्रपट, संगीत किंवा तुमच्या आवडत्या गोष्टींवर चर्चा करा. पण जर असं होत नसेल तर हे फारच निराशाजनक आहे. 20 वर्षांपूर्वी किंवा त्याहून अधिक काळ सुरू झालेली नवीन गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूला एक रुम मिळते. ही एक गोष्टही त्यासाठी कारणीभूत असू शकते," असं सुनील गावसकर यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना म्हटलं आहे.
याआधी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना आर अश्विनने सध्याच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये खेळाडू किती एकटे असतात यावर भाष्य केलं होतं.
"यापूर्वी जेव्हा क्रिकेट खेळलं जायचं, तेव्हा संघातील सहकारी मित्र होते. पण आता ते फक्त सहकारी आहेत. सध्या खेळाडू स्वत:ला उत्कृष्ट बनवण्यात आणि आपल्या आजुबाजूला असणाऱ्या खेळाडूंच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करत आहेत हा सर्वात मोठा बदल आहे. त्यामुळे कोणालाच मित्रा कसा आहेस? असं विचारण्यासाठीही वेळ नाही," अशी खंत आर अश्विनने व्यक्त केली होती.