नवी दिल्ली : ५० आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये बदल करुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने त्या चलनात आणल्या. त्यानंतर आता आरबीआयने आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नोटबंदीनंतर आरबीआयने २०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता १० रुपयांच्या नोटमध्ये काही बदल करुन लवकरच नवी नोट चलनात आणण्यात येणार आहे. पाहूयात कशी असणार आहे ही १० रुपयांची नवी नोट...
मिळालेल्या माहितीनुसार, दहा रुपयांनी नवी नोट ही महात्मा गांधी सीरिजअंतर्गत येणार आहे. या नोटचा रंग हा तपकिरी असणार आहे. तसेच, या नोटवर कोणार्क सूर्य मंदिराचं चित्रही असणार आहे.
असं म्हटलं जात आहे की, आरबीआयने यापूर्वीच एक अरब नोट छापल्या आहेत आणि या नोटा लवकरच चलनात आणण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
१० रुपयांची सध्या चलनात असलेल्या नोटचं डिझाईन हे २००५मध्ये बदलण्यात आलं होतं. या नोटांवर पूढील बाजुला महात्मा गांधींचा फोटो आहे तर पाठीमागे हत्ती, वाघ आणि गेंडा यांचा एकत्रित फोटो आहे. त्यानंतर आता पुन्हा या नोटमध्ये बदल करण्यात येत आहे.