'मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे; पण कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही'

एक खासदार म्हणून मी कधीही धार्मिक किंवा जातीय भेद केला नाही.

Updated: Dec 22, 2019, 01:23 PM IST
'मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे; पण कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही' title=

नागपूर: मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे, पण आजपर्यंत कोणत्याही धर्मासोबत अन्यायाने वागलो नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते रविवारी नागपूरच्या संविधान चौकात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना लोकसभा निवडणुकीवेळी घडलेला एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीला अनेक मुस्लिमांना मला मत द्यायचे होते. 

मात्र, त्यावेळी सोशल मीडियावर माझा हाफ चड्डीतील (संघाचा गणवेश) फोटो व्हायरल करण्यात आला. त्यावेळी अनेक मुस्लिमांनी मला याबद्दल विचारणा केली. तेव्हा मी त्यांना म्हटले की, मी १०१ टक्के प्युअर चड्डीवाला आहे, संघनिष्ठ आहे. मात्र, एक खासदार म्हणून मी कधीही धार्मिक किंवा जातीय भेद केला नाही. मला मत न दिलेल्यांसाठीही मी काम करेन, असे आश्वासन मी त्यांना दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

CAA:शरणार्थींनी हिंदू असणं पाप आहे का; गडकरींचा सवाल

या सभेत नितीन गडकरी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे जोरदार समर्थन केले. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) हे मुस्लिमविरोधी नाही. आपल्या सगळ्यांना या देशात सोबत राहायचे आहे. त्यामुळे CAA कायद्यामुळे मुस्लिम समाजाने घाबरून जाण्याचे कारण नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

तसेच स्वधर्मीयांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. मात्र, देशातील मुस्लिमांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आमच्या गुरूंनी कधीच आम्हाला मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवले नाही. त्यामुळे आम्हाला देशातील मुस्लिमांना बाहेर काढायचे नाही, केवळ घुसखोरांना हाकलायचे आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.