मुंबई : महाराष्ट्रामध्ये एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज ३,७५२ रुग्ण वाढले आहेत, तर १०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या १,२८८ने वाढली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,२०,५०४ एवढी आहे, तर ५३,९०१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. राज्यात आज १,६७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ६०,८३८ एवढी झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत ५,७५१ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. एकट्या मुंबईमध्येच कोरोनामुळे ३,३११ मृत्यू झाले आहेत. राज्यात आज झालेल्या मृत्यूंपैकी ६७ मुंबईत, भिवंडीमध्ये २७, ठाण्यामध्ये ४, वसई विरारमध्ये १ आणि नागपूरमध्ये १ मृत्यू आहे.
राज्यात आज झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष आणि ३४ महिला आहेत. आजच्या १०० मृत्यूंपैकी ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले ४५ रुग्ण आहेत, तर ४० ते ५९ या वयोगटातील ४६ जणांना जीव गमवावा लागला आहे. ४० वर्षांखालच्या ९ रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.
महाराष्ट्रातला रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५०.४९ टक्के एवढं आहे. राज्यातला कोरोना मृत्यूदर हा ४.७७ टक्के आहे.