Maharashtra Weather : महाराष्ट्रातून आता अवकाळीनं काढता पाय घेतला असून, कमाल तापमानाच काहीशी वाढ नोंदवली जाऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. तसं झालंही. सकाळच्या वेळी राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं. पण, आता पुन्हा एकदा राज्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather heavy rain storm predictions hailstorm in northern india )
7 ते 9 एप्रिल या दिवसांदरम्यान राज्यात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात पावसामुळं शेतपिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
'स्कायमेट'च्या (Skymet) अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये आसाम, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल. तर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पर्वतीय पट्ट्यांमध्ये हलक्या स्वरुपातील बर्फवृष्टी होऊ शकते. उर्वरित पूर्वोत्तर भारत, केरळ, तामिळनाडूच्या काही भागांत हलक्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, कर्नाटक, ओडिशा, हिमालयाचा पश्चिम भाग आणि पंजाबमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं देशातील बहुतांश राज्यांत पावसाचा शिडकावा होऊ शकतं अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. किमान 2 ते 3 दिवसांनी ही परिस्थिती सुधारणार असून, त्यानंतर कमाल तापमानात वाढ होईल.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीरचं खोरं (Kashmir), स्पितीचं खोरं या भागांत थंडी काही अंशी वाढेल, तर अती उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीचाही इशारा हवामान खात्यानं दिला आहे. सध्याच्या घडीला हिमाचल आणि त्या आजुबाजूच्या पट्ट्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या पाहता तिथल्या हवामानाचा अंदाज घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.