वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'

Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray)  एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2024, 02:47 PM IST
वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...' title=

Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray)  एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मनसे सोडताना त्यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. वंचितने वसंत मोरे यांना पुण्यातील लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती. पण लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर वसंत मोरे आता 2 महिन्यातच वंचितलाही सोडचिठ्ठी देत आहेत. वसंत मोरे यांनी आपण 9 जुलै उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

वसंत मोरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर वसंत मोरे यांनीच आपण प्रवेश कऱणार असल्याचं जाहीर केलं. याआधी संजय राऊत यांनी लवकरच ते पक्षात प्रवेश करतील अशी माहिती दिली होती. 

विधासनभा निवडणूक लढणार?

वंसत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी हवी होती. पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे आपल्याला पक्ष उमेदवारी देत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी संजय राऊतांची भेटही घेतली होती. पण महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. अखेर त्यांनी वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढली.  मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला होता. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

मला मतदारांनी स्विकारलं नाही - वसंत मोरे

उद्धव ठाकरेंची भेट घेतली असता त्यांनी 9 तारीख दिली आहे. 9 तारखेला मातोश्रीवर माझ्या समर्थकांसह पक्षप्रवेश पार पडणार आहे अशी माहिती वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणूक लढण्यासंबंधीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं. 

वंचित सोडण्यामागील कारण विचारलं असता वसंत मोरे म्हणाले की, "मी वंचितमध्ये गेलो होतो. मला मतदारांनी स्विकारलं नाही, यामुळे मी बाळासाहेबांसोबत बोललो होतो. पुण्यात मतांचा टक्का हवा तितका नव्हता. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे". 
 
"माझी सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. मी 2006 पर्यंत कॅटनमेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभाग अध्यक्षही होतो. त्यामुळे परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे झाला आहे," असं वसंत मोरे यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "पुणे महापालिकेत हे सगळे माझे सहकारी आहेत. त्यामुळे पुणे महापालिका आणि विधानसभ निवडणुकीत पुणे शहरात ठाकरे गटाकडून कडवं आव्हान उभं करु असा निर्धार त्यांनी व्यक्त केला".