टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत सुपर 8 फेरीत दाखल झाला असून आपला पहिला सामा खेळणार आहे. भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरोधात होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची पत्रकार परिषद पार पडली. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर असणाऱ्या राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. मात्र बार्बाडोस येथील मैदानावरील त्याचे आकडे फारसे चांगले नाहीत. पत्रकार परिषदेत पत्रकाराने मैदानावरील त्याच्या खराब कामगिरीची आठवण करुन दिली असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही. राहुल द्रविड वारंवार याबद्दल विचारण्यात आलं असता काहीसा संतापला होता.
आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा राहुल द्रविड प्रश्न ऐकल्यानंतर काहीसा चिडला आणि उत्तरही दिलं. मी गोष्टी मनात ठेवत नाही आणि फार लवकर त्या विसरुन पुढे जातो असं तो म्हणाला. तसंच प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करण्यावर आता आपलं लक्ष असून, भूतकाळातील आपल्या कामगिरीचा विचार करत नसल्याचंही सांगितलं.
रिपोर्टर - राहुल तू एक क्रिकेटर म्हणून येथे खेळला आहेस. 97 च्या कसोटीबद्दल फार चांगल्या आठवणी नाहीत?
राहुल द्रविड - फार तुझे आभार मित्रा! माझ्याकडे काही इतर चांगल्या आठवणीही आहेत.
रिपोर्टर - तोच माझा खऱा प्रश्न आहे. तुझ्याकडे आता नव्या आणि चांगल्या आठवणी तयार करण्याची संधी आहे?
राहुल द्रविज - अरे देवा! मी काहीच तयार करण्याचा प्रयत्न करत नाही आहे.
राहुल द्रवि़ड 1997 मध्ये बार्बा़डोसमध्ये वेस्ट इंडिजविरोधात कसोटी खेळला होता. राहुल द्रविडने या सामन्यात 78 आणि 2 धावा केल्या होत्या. भारताने ब्रिजटाऊनमधील हा सामना 38 धावांनी गमावला होता. पण राहुल द्रविड आता भूतकाळात 25 वर्षांपूर्वी काय झालं याकडे लक्ष न देता सध्या हातात जी जबाबदारी आहे त्याकडे लक्ष देत आहे.
"मी गोष्टी विसरुन पुढील वाटचाल करत असतो. माझ्याबद्दल ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी पाठीवर ओझं ठेवत नाही. मी सध्याच्या घडीला काय करत आहे याकडे लक्ष्य केंद्रीत करतो. 1997 किंवा इतर कोणत्या वर्षी काय झालं याची मला अजिबात चिंता नाही," असं राहुल द्रविड म्हणाला आहे.
"जर तुम्ही मला सांगितलं असतं की 80 नाही 121 धावा केल्या असत्या तर जिकला असता असं सांगितलं असतं तर मी विचार केला असता. पण, उद्या हा सामना जिंकला तरी दुर्दैवाने, स्कोअरकार्डवर 80 च धावसंख्या राहणार आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी ते बदलणार नाही. मी गोष्टी बदलायचा विचार करत नाही. मी फक्त पुढे जात राहतो. मग माझ्यासमोर चांगलं, वाईट काहीही असो," असं राहुल द्रविड म्हणाला आहे.
"मी आता स्वत:बद्दल खेळाडू म्हणून विचार करत नाही. उद्यावर लक्ष्य केंद्रीत करत चांगला निकाल आणण्याचा प्रयत्न असतो," असं राहुल द्रविडने स्पष्ट केलं.